तत्त्वनिष्ठ लढवय्या
समाजवादी विचारसरणी अनुसरून तत्त्वनिष्ठ राजकारण करणे जवळ जवळ अशक्य बनलेले असताना भाई वैद्य यांच्यासारख्या नेत्यांचे जाणे पोकळी निर्माण करणारे आहे. विविध शेलक्या विशेषणांनी समाजवाद्यांचा उद्धार करण्याचे आजच्या काळाचे धारिष्ट्य, भाईंच्या जाण्याने आणखी वाढण्याचा धोका आहे. दीर्घ काळ राजकारणात राहूनही भाईंनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. तत्त्वबद्ध राहत ध्येयपूर्तीच्या मार्गाने जाता येते हे त्यांनी दाखवून दिले. आपला मार्ग खडतर आहे, त्यात 'शॉर्टकट' नाहीत, याची भाईंना जाणीव होती. मात्र, मानवाच्या भल्यासाठी, समता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवतावाद जपण्यासाठी हाच मार्ग असल्याचे ते सांगत. ते बोलघेवडे समाजवादी नव्हते; परंतु तरुण मनांना प्रज्वलित करण्याची शक्ती त्यांच्या वाणीत होती. शब्दांपुढे शब्द रचत, अनुप्रास साधत बोलण्याची वक्तृत्वशैली त्यांच्याच नव्हती; परंतु भांडवलशाहीच्या, जातिवादाच्या आणि मूलतत्त्ववादाच्या विरोधात ताजी उदाहरणे देत, त्यांची कटकारस्थाने उघड करत ते कार्यकर्त्यांचे प्रबोधन करीत. माणसे जोडण्याची किमया भाईंनी साधली होती. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर त्यांनी आपल्या संघटनकौशल्याने कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते. भाई सच्चे समाजवादी होते आणि तितकेच सच्चे कार्यकर्ते होते. समाजवादाच्या सैद्धान्तिक चर्चांबरोबर ते गरीब, उपेक्षित, वंचित जनतेसाठी सदैव लढण्याकरिता सज्ज असत. म्हणूनच नव्वदीच्या उंबरठ्यावर असतानाही ते कधीच निव्वळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेले नाहीत. चळवळी, आंदोलने, अभ्यासगट, शिबिरे, परिषदा या माध्यमांतून ते सतत कार्यरत असत आणि विशीच्या कार्यकर्त्याच्या उत्साहाने ते रस्त्यावर उतरत. समतेच्या तत्त्वाने ते भारलेले होते. सर्वांचे कल्याण व्हायला हवे, सर्वांना समान संधी मिळायला हवी आणि त्यासाठी केंद्र आणि राज्यांतील सरकारांनी पूरक धोरणे राबवायला हवीत, यासाठी ते सतत आग्रह धरत. आणीबाणीनंतर राज्यातील पुरोगामी लोकशाही दलाच्या (पुलोद) सरकारमध्ये काही काळासाठी मंत्री झाल्यानंतर राज्यातील पोलिसांच्या गणवेशात पूर्ण पँट आणण्यापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवावेतन आणि त्याची महागाईशी जोडणी करण्यापर्यंत त्यांनी अनेक मूलभूत कामे केली. तत्त्वनिष्ठ वगैरे असल्याचे दाखविणाऱ्या अनेकांची भाषा सत्तेत आल्यानंतर बदलते, असा अनुभव आहे. भाई त्यांपैकी नव्हते. त्यामुळे सुमारे सत्तर वर्षांच्या सार्वजनिक जीवनात भाईंनी ना कधी राजकीय कोलांटउड्या मारल्या, ना कधी आपल्या विचारांशी, तत्त्वांशी प्रतारणा केली. पुण्याच्या पूर्व भागातील विविध जाती-धर्मांच्या संमिश्र वस्तीत गेलेले बालपण, स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी, शालेय जीवनातच 'चले जाव'सारख्या आंदोलनात घेतलेला सहभाग यांतून भाईंची जडणघडण झाली. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांच्या 'काँग्रेस सोशालिस्ट पार्टी'चे सदस्यत्व १९४६मध्ये स्वीकारून भाईंनी आपली राजकीय आणि सामाजिक भूमिका पक्की केली. पुढे आयुष्यभर हीच भूमिका घेऊन त्यांनी मार्गक्रमणा केली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी सत्तेचे राजकारण केले नाही. त्याऐवजी समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यासाठी ते लढे देत राहिले. सत्याग्रह करीत राहिले आणि प्रसंगी मारहाणही सहन केली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणीबाणी अशा सर्व लढ्यांत सक्रिय सहभागी होत त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. गोरगरिबांच्या विकासासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी लढे देत असतानाच भाईंचे समाजवादी राजकारणही सुरू होते. आपला विचार रुजविण्यासाठी मिळतील तेवढ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ते झटत राहिले. भाईंच्या कार्याला शहराची वा राज्याची सीमा कधीच नव्हती; परंतु भाई आणि पुणे यांच्यातील अनुबंधही खास आहेत. १९७४मध्ये पुण्याचे महापौर भूषविलेल्या भाईंबद्दल पुणेकरांत नितांत आदर होता. पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील कार्यकर्त्यांचे ते आधारवड होते. नव्वदच्या दशकानंतर स्वीकारण्यात आलेल्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) या धोरणाला; तसेच उन्मादी हिंदुत्ववादाला त्यांचा कडाडून विरोध होता. या दोहोंच्या विरोधात त्यांनी लढे उभारले आणि या विरोधातील चळवळींना सक्रिय आधार दिला. उन्मादी राजकारणावर स्वार होऊन भांडवलवादी शक्ती सर्वसामान्यांचे खच्चीकरण करीत असल्याकडे ते लक्ष वेधत आणि लढण्यासाठी आवाहन करीत. आज भाई नसले, तरी मानवतावाद रुजविण्यासाठी हा लढा सर्वांना लढावा लागणार आहे. तीच भाईंना खरी श्रद्धांजली ठरेल.